गडचिरोलीत शहर झाले भक्तिमय, फुटका मंदिरात स्वच्छता अभियान

इंदिरा गांधी चौकाला केले सुशोभित

गडचिरोली : अयोध्येतील राम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे गडचिरोली शहरही भक्तिमय झाले आहे. रविवारी मंदिर स्वच्छता अभियानांतर्गत गडचिरोली शहरातील प्रसिद्ध फुटका मंदिर (हनुमान मंदिर) येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी खासदार अशोक नेते यांनी हातात झाडू घेऊन मंदिराच्या गाभाऱ्याची व परिसराची स्वच्छता केली.

प्रभू रामाच्या बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून आपण दिवाळीसारखा सण साजरा करावा, घरोघरी दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा, असा संदेश यावेळी खा.नेते यांनी दिला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, युवा मोर्चाचे नेते आशिष कोडाप, सामाजिक नेते कृपाल मेश्राम, भरत भारद्वाज, कमलेश बिश्वास, ईकबाल भाई, संजय गणवेनवार, आसाराम तिवारी तसेच रामभक्त उपस्थित होते.

गांधी चौकात तयारीची पाहणी

सोमवारच्या कार्यक्रमानिमित्त गडचिरोलीचा इंदिरा गांधी चौक भगवामय करण्यात आला आहे. चौक सजवण्यासाठी खासदार अशोक नेते यांच्यासोबत आ.डॉ.देवराव होळी व भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाहणी करत जय्यत तयारीला सुरुवात केली. यावेळी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, विश्व हिंदू परिषदेचे रामायण खटी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, माजी पं.स. उपसभापती विलास दशमुखे, तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.