मॅरेथॅान स्पर्धेसह रॅलीने दुमदुमला जिल्हा, डीजेच्या तालावर थिरकले हजारो लोक

आदिवासी दिनानिमित्त जिल्हाभर कार्यक्रम

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काढण्यात आलेल्या रॅलीत पिवळे वस्र परिधान करत हजारो आदिवासी बांधवांनी सहभागी होऊन डीजेच्या तालावर ठेका धरला. विशेष म्हणजे गडचिरोली शहरात प्रथमच आदिवासी दिनी मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात मोठ्या संख्येने युवक-युवतींनी सहभाग नोंदविला.

आ.डॅा.देवराव होळी यांच्या पुढाकाराने आणि काही आदिवासी संघटनांच्या सहकार्याने आयोजित मॅरेथॅान स्पर्धेला डॅा.होळी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. यावेळी पं.स.चे माजी उपसभापती विलास दशमुखे, कुणाल कोवे, भाजपचे पदाधिकारी मधुकर भांडेकर, मुक्तेश्वर काटवे आदी उपस्थित होते. महिला आणि पुरूष अशा दोन गटात झालेल्या या स्पर्धेत हजारो रुपयांची वेगवेगळी बक्षीसे देण्यात आली.

दुपारी गडचिरोली शहरातून डीजेच्या तालावर काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो महिला, युवक-युवती सहभागी झाले होते. यावेळी आदिवासींच्या पारंपरिक नृत्यांनी लक्ष वेधून घेतले. ही रॅली वाजतगाजत आरमोरी मार्गावरील संस्कृती सांस्कृतिक भवनात दाखल झाल्यानंतर तिथे जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.प्रमोद खंडाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उद्घाटक म्हणून समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॅा.सचिन मडावी, तर अध्यक्षस्थानी गुलाब मडावी होते.

तत्पूर्वी सकाळी 10 वाजता कै.बाबुराव मडावी चौकात झालेल्या माल्यार्पण व अभिवादन कार्यक्रमाला अ.भा.आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ कार्याध्यक्ष घनश्याम मडावी, भरत येरमे, आनंद कंगाले, डॅा.बागराज धुर्वे, मारोतराव इचोडकर, वसंतराव कुलसंगे आदि अनेक जण उपस्थित होते.