गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात जनजागरण मेळाव्यांसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वात पोलिस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. त्यात 550 पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. रॅलीचा समारोप एम.आय.डी.सी. पटांगणावर झाला. त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले. याशिवाय जिल्ह्रातील सर्व उपविभाग तसेच पोलीस स्टेशन, मदत केंद्रात मिळून 10 हजार वृक्ष लागवड करण्यात आली. याशिवाय जनजागरण मेळाव्यांसह अनेक कार्यक्रम झाले.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाया युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडानअंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्यात आता ‘स्वयंसिद्ध’ (कराटे) प्रशिक्षणाचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील शहीद पांडू आलाम सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यात अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली व हेडरी उपविभागातून 82 युवतींनी आपला सहभाग नोंदविला. दिनांक 9 आॅगस्टपासून 10 दिवस आयोजित या स्वयंसिद्ध (कराटे) प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणाचे उद्धाटन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींना स्वयंसिद्ध (कराटे) किट वाटप करण्यात आले. यावेळी कौशल्य स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशिक रायपुरे व सेजल गद्देवार यांनी आत्मसंरक्षणपर प्रात्यक्षिक दाखविले.
यासोबतच जिल्हयातील गरजु व सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कौशल्य विकास केंद्र (स्किलिंग इन्स्टिटयुट)ची सुरुवात करण्यात आली होती. त्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील युवक-युवतींना सॉफ्टवेअर व वेब डेव्हलपरचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच फास्टफुड व मत्स्यपालन प्रशिक्षण देण्यात आले. सर्व प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये पार पडला.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयस्तरावर व पो.स्टे., पोमके स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात मॅराथॉन, जनजागरण मेळावे, विविध स्पर्धा, रॅली, रेलानृत्य स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम झाले.