गडचिरोली : जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच सोपविलेली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण, मतदार मदत केंद्र, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. निवडणूक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे. कोणत्याही विभाग प्रमुखाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, अथवा रजेवर जाऊ नये, असे निर्देशही दैने यांनी दिले.
सरकारी कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशिला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. विशेष म्हणजे रस्ते आणि सार्वजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.
निवडणुकीच्या तसेच अत्यावश्यक सेवेत कर्तव्यावर असलेला कोणताही कर्मचारी पोस्टल बॅलेट मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधीत कार्यालय प्रमुखांनी घ्यावी, यासाठी कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमून मतदानासाठीचे विहित फॉर्म भरून घ्यावे. जिल्ह्यात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदार नोंदणी करून घ्यावी. ज्यांची मतदार नोंदणी इतर जिल्ह्यात आहे आणि ते आता या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनीही आपली मतदार नोंदणी गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतरीत करण्यासाठी अर्ज करावा व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 100 टक्के मतदान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.