गडचिरोली : दारूने भरलेले वाहन अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन मोठे नुकसान करणाऱ्या आरोपींच्या म्होरक्याला अटक करण्यात आली. अजय चिचघरे असे त्याचे नाव असून तो नागपूरमध्ये लपून बसून पोलिसांना हुलकावणी देत होता. गडचिरोलीला येताच त्याला उचलण्यात आले.
पोलीस सूत्रानुसार, दिनांक 1 ऑक्टोबर रोजी चिचघरे व त्याच्या सहकाऱ्यांचे दारूने भरलेले वाहन अडविण्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रयत्न केला होता. परंतू वाहन न थांबविल्याने पथकाने गाडीचा पाठलाग करत तस्करांच्या वाहनाला गाठले. पण पोलीस गाडीतून उतरताच तस्करांनी त्यांचे वाहन वेगात पोलिसांच्या अंगावर चालवण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर आरोपी आपल्या वाहनासह पळून गेले. पोलिसांनी त्यांच्या मागावर राहून नागपूर येथुन दिनांक 11 रोजी दोघांना अटक केली. परंतु अवैध दारु विक्रेता अजय चिचघरे हा अंधाराचा फायदा घेऊन नागपूर येथूनही पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तो गडचिरोलीत येणार असल्याची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सापळा रचुन त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
घटनेच्या वेळी आरोपी अजय चिचघरे हा दुसऱ्या चारचाकी वाहनाने दारुच्या वाहनाची पायलटिंग करून दारूच्या वाहनातील आरोपी गौरव कोडाप व प्रणय पंदीलवार यांच्यासोबत फोनवर संपर्कात होता. त्याने फोनवर दिलेल्या सुचनेप्रमाणे आरोपी गौरव कोडाप याने पोलिसांचा जीव घेण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या वाहनास जोरदार धडक दिली होती.
सदर गुन्ह्रातील तिन्ही आरोपी अटक होताच पोलीस पथकाने आरोपींनी धडक देण्याकरीता व दारूच्या वाहतुकीसाठी वापरलेले बोलेरो पिकअप वाहन आणि मुख्य आरोपीने पायलटींगकरीता वापरलेली स्विफ्ट कार नागपूर येथुन जप्त केली. सदर गुन्ह्रात न्यायालयाने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोपीला आधी पोलीस कोठडी दिली. ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत चंद्रपूर कारागृहात रवाना करण्यात आले. या गुन्ह्राचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भगतसिंग दुलत करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. उल्हास भुसारी, सपोनि. भगतसिंग दुलत, हवालदार सतीश कत्तीवार, प्रेमानंद नंदेश्वर, अकबर पोयाम, राकेश सोनटक्के, पोअं श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, माणिक दुधबळे, सिकंदर मंडल, शुक्राचारी गवई व उमेश जगदाळे यांनी पार पाडली.