गडचिरोली : वाघ आणि हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी कसे करता येईल याची काळजी घेण्यासोबत वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई वेळेत द्या, अशा सूचना आ.कृष्णा गजबे यांनी वडसा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मानव-बिबट संघर्षावर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठीत करण्यासंदर्भात उपवनसंरक्षक, वडसा वनविभाग यांच्या दालनात आमदार गजबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आ.गजबे यांनी वनाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.
या बैठकीत बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात काही उपाययोजना सूचविण्यात आल्या. त्यात नागरी क्षेत्रात बिबटयाच्या वास्तव्याच्या ठिकाणी गस्त करून संनियंत्रण करणे, घरातील पाळीव प्राण्यांना रात्रीच्या वेळी बंदीस्त करुन ठेवणे, रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी माहिती फलक लावणे, गावात बैठका घेऊन, फलक लावून जनजागृती करणे, मानद वन्यजीव रक्षकांचे सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी घेणे, ज्या क्षेत्रात बिबट्याचे अस्तित्व आहे त्या ठिकाणी गस्ती पथकाची नेमणूक करणे, बिबट असलेल्या क्षेत्रात कृत्रिम पाणवठे निर्माण करून पाण्याची व्यवस्था करण्यात यावे, बिबट असलेल्या क्षेत्रात गवत कुरण व इतर मृद व जलसंधारणाची कामे करुन तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरण निर्मिती करणे, बिबटयाला पकडण्यासाठी पिंजरे, सावज लावणे, बिबटयाचे सनियंत्रण करण्यासाठी गावातील १० स्थानिक लोकांची पीआरटी टिम तयार करुन लोक रात्रीच्या वेळेस जास्त वेळ घराबाहेर राहणार नाहीत यासाठी जनजागृती करणे, बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रामध्ये लाऊडस्पिकरव्दारे दवंडी देणे, एखादया वेळेस बिबट नागरी वस्तीमध्ये शिरल्यास किंवा बिबट्याच्या हल्ल्यात व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास किंवा बिबट्याला पकडण्याकरीता आरआरटीची स्थापना करणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी आवश्यक साहित्यांचे खरेदी करावी, अशीही सूचना आ.कृष्णा गजबे यांनी यावेळी केली.
या बैठकीला उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, उपविभागीय वनाधिकारी एम.एन चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी धांडे, अविनाश मेश्राम, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तालुका महामंत्री योगेश नाकतोडे, कृ.उ.बा.समितीचे संचालक हिरालाल शेंडे, कुरुडचे ग्रा.पं.सदस्य शंकर पारधी, शिवराजपूर ग्रा.पं.सदस्य प्रमोद झिलपे व शेतकरी उपस्थित होते.