अरततोंडी देवस्थानात गोपाळकाल्याने महाशिवरात्री यात्रोत्सवाचा समारोप

'ब' वर्ग पर्यटनस्थळासाठी प्रयत्न- खा.नेते

आरमोरी : आरमोरी तालुक्यातील अरततोंडी येथील डोंगरावर असलेलेल्या भगवान शंकराच्या मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या यात्रा उत्सवाचा समारोप झाला. यावेळी आयोजित गोपाळकाल्याला खासदार अशोक नेते यांनी उपस्थित राहून पुजाअर्चना केली.

याप्रसंगी खासदार नेते म्हणाले, या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. पण थोडी वनविभागाची अडचण असल्यामुळे या ठिकाणी विकासत्मक कामे करण्यास विलंब होत आहे. या स्थळाला ‘क’ वर्ग धार्मिक पर्यटस्थळातून ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळात टाकण्यासोबत केंद्र शासनाकडून पर्यटन विकासाची कामे खेचून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

या परिसरात उन्हाळी धानपिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याच्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते. ती अडचण आता दूर करण्यात आली. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात हत्तींच्या कळपाचा वावर आहे. यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. तरीही नागरिकांनी काळजी घेऊन सतर्कता बाळगावी, असे खा.नेते म्हणाले.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा सचिव नंदु पेठ्ठेवार, नंदू नाकतोडे, अरततोंडी देवस्थान समितीचे अध्यक्ष पुंडलीक घोडाम, पळसगांवचे अध्यक्ष ठाकरे, किन्हाळा गावचे सचिव गणेश मातेरे व देवस्थानचे संचालक, तसेच मोठ्या संख्येने यात्रेतील भाविक उपस्थित होते.