ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

वृत्तपत्रसृष्टीतील तारा आणि सच्चा समर्थक गेला

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवारी ज्येष्ठ पत्रकार स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

नवराष्ट्र वृत्तपत्राचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी असताना अरविंद खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने गुरुवार, 9 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यामुळे गडचिरोलीत दाखल होताच ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट दिली.

या भेटीत ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी अरविंद खोब्रागडे हे अगदी कमी वयात गेल्याचे मोठे दुःख आहे. अरविंदच्या जाण्याने व्यक्तिशः माझा सच्चा व खंदा समर्थक गेल्याचे शल्य आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील वृत्तपत्र सृष्टीचा चमकता तारा निखळला, असा शोकसंदेश व्यक्त केला. खोब्रागडे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांच्या सदैव पाठिशी राहणार असल्याचे सांगत त्यांना दिलासा दिला. अरविंद यांच्या पत्नी लता खोब्रागडे, मनिष व गितेश खोब्रागडे तसेच परिवारातील अन्य सदस्यांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, आकाश पगाडे, कुणाल चिलगेलवार, हिमांशु खरवडे आदी उपस्थित होते.