गडचिरोली : सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या मोबाईलच्या वापरासोबत प्रवासादरम्यान मोबाईल हरविण्याच्या, चोरीला जाण्याच्या तक्रारीही वाढत आहेत. संबधित पोलिस स्टेशनकडून अशा तक्रारी गडचिरोली पोलिस दलाच्या सायबर शाखेकडे येतात. सायबर शाखेने शोधून काढलेल्या एकूण मोबाईलपैकी 76 नागरिकांना सोमवारी त्यांचे मोबाईल पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

सन 2022 या वर्षात 22 लाख रुपये किमतीचे एकुण 150 मोबाईल शोधून ते संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले. सन 2023 मध्ये आतापर्यंत एकुण 135 मोबाईलचा शोध लावण्यात यश आले. त्यांची अंदाजे किंमत 18 लाख 80 हजार 975 रुपये एवढी आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, कुमार चिंता (प्रशासन), यतिश देशमुख (अहेरी) यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शाखेचे प्रभारी अधिकारी उल्हास भुसारी, उपनि निलेश वाघ, अंमलदार श्रीनीवास संगोजी, वर्षा वहिरवार, संगणी दुर्गे, गायत्री नैताम, किरण रोहणकर, योगेश खोब्रागडे, सचिन नैताम यांनी पार पाडली.
सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा
अलिकडे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, लोकांची वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवुन फसवणूक केली जाते. त्यामुळे जनतेनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे आणि मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ तक्रार नोंदवावी. तसेच ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर 1930 या नंबरवर तक्रार नोंदवावी. यासोबतच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशन, मदत केंद्रात जाऊन तक्रार करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
































