गडचिरोली-चिमूर मतदारसंघात ७० टक्क्यांवर मतदान, पथके सुरक्षितपणे मुख्यालयी दाखल

पहा कोणत्या विधानसभा मतदार संघात किती मतदान

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात यावेळची निवडणूक कोणत्याही नक्षली कारवायांशिवाय निर्विघ्नपणे पार पडली. दहशतीला झुगारत गडचिरोलीच्या दुर्गम भागातील नागरिक यावेळीही मतदानासाठी सरसावल्याचे दिसून आले. शनिवारी दुपारपर्यंत दुर्गम भागातील मतदानाची पडताळणी होणे बाकी असल्याने मतदान संपून 24 तास झाले तरीही मतदानाची अंतिम टक्केवारी प्रशासनाने जाहीर केलेली नव्हती. मात्र ही टक्केवारी 70 टक्क्यांच्या वर राहणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, या लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदार संघात 74.41 टक्के, ब्रम्हपुरी मतदार संघात 75.10 टक्के, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदार संघात 69.24 टक्के, तर गडचिरोलीतील आरमोरी मतदार संघात 73.69 टक्के आणि अहेरी मतदार संघात 66.83 टक्के मतदान झाले आहे. आता केवळ गडचिरोली या एका मतदार संघांची मतदान टक्केवारी प्राप्त होताच लोकसभा क्षेत्राची अंतिम टक्केवारी मिळणार आहे.

ईव्हीएम परत येण्यास सुरूवात

शुक्रवार, दि.19 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर सायंकाळपासून मतदान यंत्र (ईव्हीएम) गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयात स्थापन केलेल्या स्ट्राँग रूममध्ये येण्यास सुरूवात झाली. दुर्गम व संवेवदनशील भागातील ईव्हीएम रविवारी संध्याकाळपर्यंत किंवा सोमवारी सकाळपर्यंत पोहोचणार आहेत. मतमोजणी प्रक्रिया ४ जून रोजी होणार असून तोपर्यंत या इव्हिएम मशीन येथील स्ट्राँगरूमध्ये कडेकोट बंदोबस्तात राहणार आहेत. स्ट्राँग रुमच्या सुरक्षा यंत्रणेची जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचनाही केल्या.