गडचिरोली : चामोर्शीमधील संताजी क्रीडांगणावर जय बजरंग युवा मंडळ (गोंडपुरा) यांच्या वतीने प्रथमच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्वात मोठ्या नमो चषक प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने होणाऱ्या रात्रकालीन कबड्डी स्पर्धेत लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदार संघातील विजयी संघांसह स्थानिक कबड्डी संघांमध्ये चुरस रंगणार आहे.
सदर स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम बक्षीस 1 लाख 11 हजार 111 रुपये, तर द्वितीय बक्षीस 99 हजार 999 रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेकरिता प्रवेश फी 3 हजार रुपये आणि आक्षेप फी 6 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. सदर स्पर्धा खुली असल्याने या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यातून पट्टीचे कबड्डीपटू सहभागी होणार आहेत.
ही कबड्डी स्पर्धा रात्रकालीन असल्याने मैदानावर हायमास्ट लावण्याचे काम सुरू आहे. तसेच सदर संपूर्ण स्पर्धा एलईडी स्क्रीनवर व व्हाट्सअॅप, फेसबुक, ट्विटर आणि टीव्ही चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे चामोर्शी शहरात या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असल्याचे भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जय बजरंग युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक आशिष पिपरे यांनी सांगितले. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धेचे संयोजक खासदार अशोक नेते यांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख रमेश अधिकारी (9834924055) यांच्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी कळविले.