यावर्षीच्या खरीप हंगामातील बियाण्यांचे २५, तर खतांचे २६ नमुने प्रयोगशाळेत नापास

कृषी विभागाने काय केली कारवाई? ऐका

गडचिरोली : जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने घेतलेले धानाच्या बियाण्यांचे २५ नमुने प्रयोगशाळेत नापास झाले आहेत. याशिवाय खतांचे २६ तर किटकनाशकांचे २ नमुने प्रयोगशाळेत नापास झाले. त्यामुळे त्या लॅाटमधील बियाणे, खत वापरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसला असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संबंधित कंपन्यांवर कायदेशिर कारवाई करण्याची प्रक्रिया कृषी विभागाने सुरू केली आहे.

कृषी केंद्रांमधून बियाणे, खते आणि किटकनाशकांची विक्री केली जात असताना कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाकडून जिल्हाभरातून नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. परंतू त्याचा रिपोर्ट येईपर्यंत त्या लॅाटमधील बियाणे, खतांचा वापर शेतकऱ्यांनी केलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांनी रितसर तक्रार केल्यास संबंधित कंपनीकडून ते बियाणे किंवा खत बदलून दिले जाते. परंतू त्यात दिरंगाई करणाऱ्या किंवा नुकसानभरपाई न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाते.

आतापर्यंत बियाण्यांचे २५ नमुने अप्राणित निघालेल्या ५ कंपन्यांविरूद्ध न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले असून एका कंपनीविरूद्धचे प्रकरण पोलिसात देण्यात आले आहे. याशिवाय खतांचे नमुने अप्रमाणित झालेल्या २ कंपन्यांविरूद्ध न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. एवढेच नाही तर बियाण्यांसाठी १०, खतांसाठी ७ तर किटकनाशकांसाठी ६ कृषी केंद्रांना विक्रीबंदचा आदेश देण्यात आल्याचे जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी संजय मेश्राम यांनी सांगितले.