नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मतदारांच्या रांगा, ग्रा.पं.निवडणुकीत ६६.९७ टक्के मतदान

धान कापणीच्या हंगामातही बजावले कर्तव्य

गडचिरोली : जिल्ह्यातील सहा तालुक्यात १८ ग्रामपंचायतींमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. यातील बहुतांश ग्रामपंचायती दुर्गम भागातील होत्या. नक्षलदृष्ट्या संवेदनशिल भाग असतानाही त्या ठिकाणी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कोणताची अनुचित प्रकार न घडता सार्वत्रिक निवडणुकीत ६६.९७ टक्के मतदान झाले. याशिवाय दोन तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसाठी ६३.८४ टक्के मतदान झाले आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागात सध्या धान कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. घरातील सर्वजण धान कापणीसाठी जातात. अशाही स्थितीत ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी काम सोडून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यास प्राधान्य दिले. नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर दुपारी लांबलचक रांगा लागल्या होत्या.

अतिरिक्त जिल्हाधिकारी संवेदनशिल केंद्रांवर

छत्तीसगड सीमेवरील अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त भागातील तीन मतदान केंद्रांना अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी भेट देऊन तेथील कर्मचारी आणि मतदारांना उत्साह वाढविला. गट्टा बीट, जांबिया गाव येथे भाकरे यांनी जाऊन तेथील कर्मचारी व मतदारांशी संवाद साधला. अहेरी आणि सिरोंचा तालुक्यात सर्वात जास्त मतदान झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी संबंधित तहसिलस्तरावर होणार आहे.