दारू आयातीचा रात्रीस खेळ चाले, वरिष्ठांना अंधारात ठेवून विशिष्ट लोकांना सूट

विशेष पथकाची कोणावर आहे कृपा?

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश सर्वच भागांत देशी-विदेशी दारू मिळते. ही दारू जिल्ह्यात हद्दीत तयार होत नाही, तर लगतच्या जिल्ह्यातून आणली जाते हे स्पष्ट आहे. या आयातीला रोखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विशेष पथकही तयार केल्याचे कळते. पण तरीही काही गब्बर पुरवठादार नदीपलीकडून दारूचा पुरवठा गडचिरोली शहरासह इतर काही भागात करत आहेत. त्यामुळे काही छोट्या लोकांवर कारवाई करून गब्बर लोकांना आयातीची मोकळीक दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या रात्रीच्या दारू वाहतुकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून दररोज ४०० ते ५०० पेट्यांची आयात गडचिरोलीत होत असल्याचे समजते. याशिवाय चिचडोहमार्गे चामोर्शीतही दारूचा पुरवठा केला जातो. यात दोन भाऊ दोन टोक सांभाळतात. एक भाऊ व्याहाड येथून माल पाठवण्याचे काम सांभाळतो, तर दुसरा गडचिरोलीत माल उतरवण्याची जबाबदारी सांभाळतो. प्रत्यक्ष माल वाहतुकीची जबाबदारी पिंटू आणि सुमन नावाच्या दोन व्यक्ती सांभाळतात. गडचिरोलीतून हा माल पुढे धानोराच्या दिशेनेही पाठविला जातो.

एवढ्या बिनबोभाटपणे हा सर्व व्यवहार होण्यासाठी एका ‘एपीआय’ची मर्जी सांभाळली जात असल्याचे बोलले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळत असल्याचे दाखविण्यासाठी काही लोकांवर कारवाया करायच्या, पण त्याची कसर काढण्यासाठी काही गब्बर लोकांना मदत करायची, असा प्रकार सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून सुरू असलेल्या या अंधारातील लाखोंच्या व्यवहारांमुळेच गडचिरोली शहरात दारूची उपलब्धता सहजपणे होऊ लागली आहे.