जिल्ह्यात 210 ठिकाणी लवकरच सुरू होणार आपले सरकार केंद्र

अनियमित आढळलेली 65 केंद्रे बंद

गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात अधिकाधिक सेवा पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आदर्श ‘आपले सेवा केंद्र’ उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. रिक्त असलेल्या 210 केंद्रांसाठी 375 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची छाननी पूर्ण करून लवकरच नव्या केंद्रांची स्थापना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

जिल्ह्यात सध्या कार्यरत ‘आपले सरकार सेवा केंद्रां’चे पुनरावलोकन करण्यात आले. सध्या 685 केंद्र कार्यरत असून अनियमितता आढळलेली 65 केंद्रे बंद करण्यात आली आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर सेवा उपलब्ध होण्यासाठी आलापल्ली, नागेपल्ली, रेपनपल्ली, वैरागड, कुनघाडा, आष्टी, घोट, विसापूर, कुरूड, मुरखळा, विवेकानंदपूर आणि सुंदरनगर या 12 ठिकाणी आदर्श ‘आपले सेवा केंद्र’ उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या कार्यशाळेद्वारे लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीला गती मिळेल, तसेच नागरिकांना त्यांच्या सेवांचा वेळेत लाभ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्या सेवा हक्कांचा लाभ मिळावा यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, राज्य मुख्य सेवा हक्क आयोग नागपूरचे उपायुक्त चव्हाण, राज्य मुख्य सेवा हक्क आयोगाचे (नागपूर) विशेष कार्यकारी अधिकारी कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रसेनजित प्रधान, तहसीलदार मोहनिश शेलवटकर व सर्व विभाग प्रमुख तथा इतर अधिकारी उपस्थित होते.

लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रचार व प्रसारासाठी आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात सूचना फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यावर संबंधित विभागामार्फत अधिसूचित सेवांची माहिती देणारे क्यूआर कोड लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत 5127 कार्यालयांपैकी 1193 कार्यालयांनी ही कारवाई पूर्ण केली असून, उर्वरित कार्यालयांनीही तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.