गडचिरोली : भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमेकडील भागात 24 तासात नवीन पोलीस स्टेशनची उभारणी करण्याचा आणखी एक प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला. कवंडे येथे या स्टेशनची उभारणी केल्याने छत्तीसगडकडून येणाऱ्या नक्षलवाद्यांची कोंडी होणार आहे. रविवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि गावकऱ्यांच्या साक्षीने कवंडे पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या 2 वर्षात जिल्ह्यात उभारलेले हे सातवे नवीन पोलीस स्टेशन (मदत केंद्र) आहे.
जवळपास एक हजार सी–60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात या नवीन पोलीस स्टेशनची उभारणी झाली. विशेष म्हणजे कवंडे या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थित रस्ताही नव्हता. मात्र 2 दिवसात नेलगुंडा ते कवंडेपर्यंत 6 किमीचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला.
या उद्घाटन कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक सीआरपीएफ अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, 37 बटालियनचे कमांडण्ट दाओ इंजिरकान किंडो व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांगीन विकासात महत्वाची भूमिका बजावेल- नीलोत्पल
नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील असलेला हा भाग आतापर्यंत विकासापासून दूर होता. मात्र या नवीन पोलीस स्टेशनमुळे माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसून सर्वांगिन विकासात हे स्टेशन महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला.
सन 2024 च्या वर्षअखेर दि.11 डिसेंबर 2024 रोजी याच भागात पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची व यावर्षी 30 जानेवारी 2025 रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती. भामरागडपासून 25 किलोमीटरवर आणि नेलगुंडापासून 6 कि.मी. अंतरावर छत्तीसगड सिमेला लागूनच असलेल्या अतिदुर्गम कवंडे व आसपासच्या गावातील नागरिकांची सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांना मुख्य प्रवाहात येण्याकरीता कवंडे पोलीस स्टेशन मैलाचा दगड ठरणार आहे.
जनजागरण मेळाव्यात साहित्य वाटप
कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशनची उभारणी करताना गडचिरोली पोलिसांनी त्या भागात उभारलेले माओवाद्यांचे स्मारक नष्ट केले. यावेळी जनजागरण मेळावाही घेण्यात आला. त्याला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नऊवारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांसाठी कपडे, ब्लँकेट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट साहित्य, व्हॉलीबॉल साहित्य इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.