शाळेतच प्रेमाचे कित्ते गिरवणाऱ्या शिक्षक-शिक्षिकेचे विलगीकरण

खरंच दुरावा कायम राहिल का?

Hands tearing a heart

चामोर्शी : तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेची ‘लव्ह स्टोरी’ चर्चेचा विषय झाल्यानंतर चौकशी समितीने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला. पण शिक्षण विभागाने त्यांना निलंबित न करता वेगवेगळ्या शाळांमध्ये बदली करून त्यांचे विलगिकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एकाच पंचायत समितीअंतर्गत ते वेगवेगळ्या गावात असल्याने खरंच त्यांच्यात दुरावा कायम राहिल का? असा सवाल गावकऱ्यांना पडला आहे.

विद्यार्थ्यांची तमा न बाळगता चक्क शाळेतच ‘गुटूरर्गू’ करणाऱ्या या प्रेमविरांचे कहाणी गावात चर्चेचा विषय झाली होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी समिती लावली. या समितीने गेल्या 14 फेब्रुवारीलाच आपला अहवाल दिला होता. त्यात त्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचे वागणे शिक्षकी पेशाला शोभनिय नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस केली होती, असे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

उशिरा का होईना, शिक्षण विभागाने त्यांच्यावर कारवाई केली, पण निलंबनाऐवजी त्यांना चामोर्शी पंचायत समितीअंतर्गत वेगवेगळ्या गावातील शाळांमध्ये स्थानांतरित करून त्यांचे विलगिकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या दोघांच्या नवीन ठिकाणच्या गावांमधील अंतर जवळपास 60 किलोमीटर आहे.