घोट येथे रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा, अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन

मुन्ना सिडाम स्मृतीप्रित्यर्थ आयोजन

चामोर्शी : घोट येथील शांतीनिकेतन कॉलनीच्या पटांगणावर स्व.मुन्ना सिडाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘भाई-भाई क्रिकेट क्लब’च्या सौजन्याने रात्रकालीन अंडरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून व चेंडू टोलवून करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मा.खा. नेते यांनी “एक गाव, एक टीम” या संकल्पनेचे विशेष कौतुक केले. खेळामध्ये पंचांची भूमिका महत्त्वाची असते. खेळ हा नेहमी वादविवादरहित आणि आनंददायी वातावरणात पार पडावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी खेळाडूंना आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, सरपंच रुपाली दुधबावरे, पोलीस निरीक्षक गोहने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी दिपक लाकडे, साहिल शेख, हेमंत पत्रे, रोहित तिमा, राज हिचामी आदी अनेक मान्यवर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व.मुन्ना सिडाम यांच्या स्मृतीला अभिवादन करत या स्पर्धेने गावातील क्रीडा वातावरणाला नवसंजीवनी मिळाली आहे.