ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती, संतप्त महिलांचा ग्रामपंचायतवर मोर्चा

नळ योजना सुरू करणार- सरपंच

वैरागड : आरमोरी पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत कोजबी येथे सध्या महिलांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

दोन-तीन वर्षांपूर्वी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून खोब्रागडी नदीवरून कोजबी ग्रामपंचायत मधील कोजबी, लोहारा, करपडा, सोनपूर या चार गावांसाठी मोठी नळ योजना सुरू केली. परंतु ग्रामपंचायतीच्या निष्क्रियपणामुळे गेल्या 15 दिवसांपासून नळ योजना बंद आहे. त्यामुळे लोहारा, करपडा, सोनपूर येथील नागरिकांना हिवाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळ योजना सुरू झाली तेव्हापासून नागरिकांना नळाद्वारे येणाऱ्या नदीच्या पाण्याची सवय झाली आहे. त्यामुळे विहिरींचे किंवा बोअरवेलचे पाणी पिल्याने नागरिकांना सर्दी पडशांचे आजार बळावले आहेत.

याबाबत वारंवार ग्रामपंचायतला पाणी सुरू करण्याविषयी विनंती करण्यात आली, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या हेकेखोरपणामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

दरम्यान सरपंच कविता ताडाम यांनी दोन दिवसात नळ योजना सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.