चामोर्शी : चामोर्शी शहरातील संताजी क्रीडांगण (गोंडपुरा) येथे प्रथमच नमो खासदार चषक प्रो-कबड्डी सामन्यांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे एलईडी स्क्रिनवर कबड्डीचे सामने पाहण्यासोबत युट्युबवरही या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस १,०१,१११ रुपये व शिल्ड, द्वितीय बक्षीस ८८,८८८ रुपये, तिसरे बक्षीस ७७,७७७ याप्रमाणे राहणार आहे. या सामन्यांचे आयोजन भारतीय जनता पक्ष चामोर्शी शहर आणि जय बजरंग युवा मंडळ संताजी नगर, गोंडपुरा चामोर्शी यांच्याद्वारा करण्यात आले आहे.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, तर सहउद्घाटक स्पंदन फाउंडेशन अध्यक्ष डॅा.मिलिंद नरोटे, विशेष अतिथी म्हणून माजी न्यायाधीश सुनील दीक्षित, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, नगरसेवक तथा कार्यक्रमाचे आयोजक आशिष पिपरे, मार्कंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार, नगरसेविका रोशनी वरघंटे, नगरसेविका सोनाली पिपरे, तसेच पल्लवी बारापात्रे, ताई श्रीमंतवार, भाजपचे शहराध्यक्ष सोपान नैताम, कालिदास बुरांडे, वासुदेव चिचघरे, किशोर कुडवे, पुरुषोत्तम भांडेकर, इसाफ बँकेचे व्यवस्थापक योगेंद्र बावनकर, आकाश थुटे, क्रीडा प्रशिक्षक राकेश खेवले, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आशिष विश्वास, बँक व्यवस्थापक आकाश थुटे, भाजपचे ज्येष्ठ नेते माणिक कोहळे, भाजप सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोक धोडरे उपस्थित होते.
सुदृढ आरोग्यासाठी खेळ आवश्यक- खा.नेते
यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते म्हणाले, मागील दोन-तीन वर्षापासून कोरोनामुळे कोणतेही खेळ झाले नाही. युवकांच्या सदृढ आरोग्यासाठी खेळ आवश्यक असल्याचे सांगत त्यासाठीच पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून नमो चषकाचे आयोजन केल्याचे सांगितले. आजचा युवक मोबाईलमध्ये दिवसभर व्यस्त असतो. या मोबाईलमुळे युवकांचे शारीरिक श्रम होत नाही. बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही महत्वाचा आहे. यामुळे युवकांनी खेळ खेळावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष पिपरे यांनी तर संचालन रमेश अधिकारी यांनी केले.