तिरुपती येथे होणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे महाअधिवेशन

ओबीसींच्या हक्कासाठी सहभागी होण्याचे डॉ.बबनराव तायवाडे यांचे आवाहन

गडचिरोली : ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे अधिवेशन तिरुपती येथे ७ ऑगस्टला होणार आहे. या अधिवेशनात ओबीसी समाज बांधव व भगिनींनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याकरिता मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांनी केले.

तिरुपती येथील अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे रविवार, ९ जुलै रोजी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला डॉ.तायवाडे यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वय डॉ.अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, कोषाध्यक्ष गुनेश्वर आरेकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, महिला शहर अध्यक्ष वृंदा ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ.तायवाडे यांनी अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विविध विषयांची माहिती यावेळी दिली. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, क्रिमिलियरची अट रद्द करावी, अट रद्द होईपर्यंत क्रिमिलियरची मर्यादा २० लाख रुपये करावी, मंडल व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसी विजा-भज व विशेष मागास प्रवर्ग समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करावेत. स्वाधार व वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करावी, ओबीसी प्रवर्गाचा ॲट्रॉसिटी कायद्यात समावेश करावा यासह अन्यही मागण्या या अधिवेशनात मांडल्या जाणार आहेत.

बैठकीला राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे अध्यक्ष प्रकाश साबळे, महिला महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष कल्पना मानकर, विदर्भ अध्यक्ष विजया धोटे, शकील पटेल, ऋषभ राऊत, राजू चौधरी, पराग वानखेडे, शुभम वाघमारे, रुचिका डफ, विनोद हजारे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.