100 दिवसांच्या सुधारणा मोहिमेत सामाजिक न्यायविभाग राज्यात तिसरा

सरकारी कार्यालयांपुढे ठेवला आदर्श

गडचिरोली : राज्यभरात राबवण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गडचिरोली कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. गडचिरोली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी आणि त्यांच्या टीमने सरकारी कार्यालय कसे असावे याचा आदर्श जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील सरकारी कार्यालयांपुढे ठेवला आहे. त्याबद्दल जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्याच्या सर्व महसूली विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांच्या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. यात सामाजिक न्याय विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांमधून गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभागाने तिसरा क्रमांक मिळवला आहे.

असे आहे सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय

या मोहिमेअंतर्गत गडचिरोली कार्यालयात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘आपला दोस्तालू / आपला स्नेहीतुडू’ या नावाने 9423116168 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ज्यामुळे दुर्गम भागातील लोकांना समाज कल्याणच्या सर्व योजनांची माहिती घरबसल्या मिळत आहे आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची आवश्यकता राहिली नाही. तसेच, 150 विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वातानुकूलित अभ्यासिका तयार करण्यात आली आहे आणि 200 क्षमतेचा सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण हॉल देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कार्यालयातील रेकॉर्ड व्यवस्थापनातही मोठी सुधारणा झाली आहे; संपूर्ण डिजिटल रेकॉर्ड रूम बनविण्यात आली असून त्यात कागदपत्रांचे अ, ब, क, ड, इ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘झिरो एनर्जी’ संकल्पनेअंतर्गत संपूर्ण कार्यालयात ऑन ग्रिड सोलर सिस्टीम बसविण्यात आल्याने विजेच्या बिलात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. याव्यतिरिक्त, संपूर्ण इमारतीत स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहांची नियमित सफाई यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
या सर्व सुधारणांबरोबरच, एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो (ISRO) येथे नेण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली.

या सर्व प्रयत्नांमुळे कार्यालयाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक सोयीस्कर झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने डॉ.सचिन मडावी यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक न्याय विभागाच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.