वृद्धाश्रमांतील आजी-आजोबांसह दिव्यांगांचे दिवाळी भेटीतून केले तोंड गोड

प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा पुढाकार

गडचिरोली : दिवाळीसारख्या मोठ्या सणाला कुटुंबियांपासून दूर असणाऱ्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना आणि दिव्यांग, गरजूंना वस्रासह मिठाईचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवारी करण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना.बच्चू कडू यांच्या सूचनेनुसार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रहार दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, गडचिरोली तालुकाध्यक्ष दिवाकर पिपरे व राजू सुरसे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला.

हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव दीपावलीच्या पर्वावर गडचिरोलीच्या ‘मातोश्री वृद्धाश्रम’ मधील गरजू, निराधार व निराश्रित वृद्ध व्यक्तींना, तसेच गडचिरोली शहरालगत असलेल्या चांदाळा व बोदली येथील दिव्यांग, गरजुंना वस्त्रदान तथा मिठाईचे वाटप करण्यात आले. समाजातील दिव्यांग व निराधार बांधवांना नैराश्याकडून आशेकडे व अंध:काराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळाच्या सणाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.