बिटस्तरावर क्रीडा कौशल्य दाखविणाऱ्या २२० खेळाडूंची प्रकल्पस्तरावर निवड

कारवाफा बिटस्तरीय क्रीडा संमेलनाचा समारोप

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा बीटस्तरावर तीन दिवसीय क्रीडा संमेलन सेमाना बायपास मार्गावरील धनुर्विद्या मैदानावर उत्साहात पार पडले. या संमेलनातील अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये आदिवासी खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य दाखविले. या स्पर्धेत उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची छाप पाडणाऱ्या कारवाफा बिटमधील २२० खेळाडूंची दिवाळी सुटीनंतर होणार असलेल्या गडचिरोली प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनासाठी निवड करण्यात आली.

प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा व कोरची या पाच बिटमधील २४ शासकीय आणि १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळांमधील खेळाडू सहभाग घेणार आहेत. सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रभू सादमवार यांच्या हस्ते ध्वजावतरण व क्रीडा ज्योत मालवून या क्रीडा संमेलनाची सांगता झाली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, प्रमिला दहागावकर, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, अनिल पवार, नितीन चंबुलवार, नितीश नेवारे, चंदा कोरचा, अभय कांबळे, राजेश मलगाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

१४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक व लांबउडी , उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण प्रदर्शित झाले. अटीतटीच्या लढतीत आदिवासी खेळाडूंचे कौशल्य दिसून आले.

समारोपीय कार्यक्रमाचे संचालन बिट निरीक्षक रविकांत पिपरे यांनी तर मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सुभाष लांडे, गुलाब डोंगरवार, संदीप राठोड, यशपाल पेंदाम, रामदास पिलारे, आशिष नंदनवार, प्रतिभा बनाईत, संगीता मोडक, शारदा कोटांगले, विलास मडावी, डाकराम धोंगडे, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसिडेन्शिअल पब्लिक स्कूलचे कर्मचारी, कारवाफा बिटमधील क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, पंच, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.