गडचिरोली : शिर्डी, शेगाव येथून देवदर्शन करून गावाकडे परत येण्यासाठी निघालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कुंभीटोलाच्या भाविकांच्या स्कॉर्पिओला बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला. रविवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात देवराव रावजी भांडारकर (55 वर्ष) हे जागीच ठार, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.
पोलिस सूत्रानुसार, कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील देवराव रावजी भांडारकर, कांता देवराव भांडारकर हे मुलगी, जावई आणि कुटुंबियांसोबत दि.24 रोजी कुरखेडा येथील लोकेश लांजेवार यांच्या स्कॉर्पिओ वाहनाने शिर्डी, शेगाव येथे देवदर्शनासाठी गेले होते. 24 मे रोजी रात्रभर प्रवास करून हे भाविक दि.25 रोजी शिर्डी आणि इतर देवस्थानांमध्ये दर्शन घेऊन परत येत होते. यादरम्यान दि.26 च्या पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजुला उलटली. यात देवराव भांडेकर यांचा जागीच मृत्यु झाला तर पत्नी कांता (50 वर्ष) नात समृध्दी कुंभलवार (6 वर्ष), जयश्री राऊत (16 वर्ष) आणि वाहन चालक जयदेव नाकाडे (40 वर्ष) हे गंभीर जखमी झाले. याशिवाय रोशन कुंभलवार आणि चेतना रोशन कुंभलवार यांनाही जबर मार लागला.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या आंबेटाकळी ते बोरी आडगाव रस्त्यावर हा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना खामगाव येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. त्यातील तीन वर्षीय समृध्दी रोशन कुंभलवार हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जाते. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव आणि कुरखेडा येथील नातेवाईकांनी अकोल्याकडे धाव घेतली.