‘त्या’ रानटी हत्तीने घेतला आणखी एका महिलेचा बळी, दोघींवर उपचार सुरू

छत्तीसगडमध्ये हुसकावण्याचे प्रयत्न सुरू

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कियरच्या जंगलात एका इसमाचा बळी घेणाऱ्या रानटी हत्तीच्या तावडीत कृष्णारजवळ पुन्हा तीन महिला सापडल्या. त्यापैकी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोघींवर उपचार सुरू आहेत. सलग दोन दिवसात दोघांचे बळी घेणाऱ्या त्या हत्तीला छत्तीसगडमध्ये हुसकावून लावण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय परिसरातील गावांमध्ये दवंडी देऊन सतर्क करण्यात आले असल्याचे भामरागडचे उपवनसंरक्षक शैलेश मीना यांनी कळविले.

या हत्तीने तेलंगणा राज्यात दोघांचा बळी घेतला आहे. त्यानंतर सिरोंचामार्गे हा हत्ती भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या गट्टा वनपरिक्षेत्रात दाखल झाला. दि.25 एप्रिल रोजी वनपरिक्षेत्र गट्टाच्या कार्यक्षेत्रात रानटी हत्तीचा वावर असल्याची सूचना मिळाल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर व क्षेत्रीय कर्मचारी त्या हत्तीच्या हालचालींवर देखरेख ठेवत होते. त्याच दिवशी हत्ती जंगलाकडे जात असताना सायंकाळी 4.30 वाजता कक्ष क्रमांक 528 नियतक्षेत्र कियर, उपक्षेत्र नारगुंडा येथील जंगलात मोहाफुले व चारोळी गोळा करण्यासाठी गेलेले गोगलु रामा तेलामी, रा.कियर यांच्यावर हत्तीने हल्ला करून त्यांना ठार केले. याची माहिती मिळताव भामरागड वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पवार यांनी इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

सदर हत्ती रात्री गट्टा वनपरिक्षेत्रातून भामरागड वनपरिक्षेत्रात जात असताना हिदुर गावात कक्ष क्रमांक 692, नियतक्षेत्र कृष्णारजवळ असलेल्या माता मंदिरात लग्न समारंभानिमित्त पूजा आटोपून परत येत असलेल्या हिदूर गावातील तीन महिला या हत्तीच्या तावडीत सापडल्या. त्यापैकी राजे कोपा हलामी (55 वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर वंजे झुरू पुंगाटी (55 वर्षे) आणि महारी देव वडे (47 वर्ष) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हुल्ला टिमसह ड्रोनच्या सहाय्याने नजर

सदर घटनेची माहिती मिळताच भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेष मीना घटनास्थळी पोहोचले व त्यांनी भामरागडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमर भिसे व वन विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांना हत्तीला छत्तीसगड राज्याच्या जंगलात हुसकावून लावण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्या जंगली हत्तीला गावापासून दूर जंगलात हाकलण्यासाठी व त्याच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी हुल्ला टिम तसेच ड्रोनच्या सहायाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह सहायक वनसंरक्षक अशोक पवार यांच्या नियंत्रणात, गट्टाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर भामरागडचे अमर भिसे यांच्या नेतृत्वात संयुक्त गस्ती पथक पुढील कार्यवाही करत आहे.

सदर रानटी हत्ती भामरागड वनपरिक्षेत्रातून पुढे छत्तीसगड राज्यातील जंगलात जाण्याची शक्यता आहे. आणखी जीवित हाणी होऊ नये म्हणून वनविभागाच्या वतीने प्रत्येक गावात दवंडी देवुन गावकऱ्यांना घराच्या बाहेर एकटे रात्री-अपरात्री निघण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन भामरागड यांची मदत घेवून हत्ती दिसल्यास त्याच्याशी छेडखानी न करता तात्काळ वन विभागास माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.