शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी आरुषी अलोने जिल्ह्यात अव्वल

अनुसूचित जाती प्रवर्गातून मारली बाजी

अहेरी : डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत आरुषी राजेंद्र अलोने ही विद्यार्थिनी अनुसूचित जाती प्रवर्गातून गडचिरोली जिल्ह्यात प्रथम आली. ती मॉडेल स्कूल अहेरीत विद्यार्थिनी आहे. या शाळेचे एकूण सात विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत हे विशेष.

सन 2023-24 मध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा (NMMS) ही भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत घेतली जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रतिभेची जोपासना व्हावी, तसेच त्यांचे 12 वी पर्यंतचे शिक्षण आर्थिक अडचणीशिवाय यशस्वीपणे व्हावे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृतीच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.

मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद रोहनकर, प्रदीप रामगीरवार, योगिता नैताम, रवींद्र खोब्रागडे, पठाण, विश्रोजवार यांनी परिश्रम घेऊन जिल्ह्यात शाळेचे नाव उज्ज्वल केल्याने या शिक्षकवृंदाचे व यश संपादीत केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.