गडचिरोली : तेलंगणात दोन जणांचा बळी घेऊन भामरागड तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्याही महिलेचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. त्यामुळे या हत्तीच्या हल्ल्यातील मृत्यूची एकूण संख्या पाचवर गेली आहे. त्यातील तीन बळी भामरागड तालुक्यातील तर दोन बळी तेलंगणातील आहेत.
महारी देव वड्डे (47 वर्ष) रा. हिदूर, ता.भामरागड असे मृत महिलेचे नाव आहे. वंजे झुरू पुंगाटी (55 वर्षे) या जखमी महिलेवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या रानटी हत्तीने नारगुंडा येथील जंगलात मोहफुले व चारोळी गोळा करण्यासाठी गेलेल्या गोगलु रामा तेलामी, रा.कियर यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले होते. त्यानंतर कृष्णारजवळ असलेल्या माता मंदिरात लग्न समारंभानिमित्त पूजा आटोपून परत येत असलेल्या हिदूर गावातील तीन महिला या हत्तीच्या तावडीत सापडल्या. त्यापैकी राजे कोपा हलामी (55 वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर वंजे झुरू पुंगाटी (55 वर्षे) आणि महारी देव वड्डे (47 वर्ष) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. आता त्यातील महारी वड्डे हिचाही मृत्यू झाला.
– तर तो हत्ती पुन्हा येणार?
दरम्यान सध्या या हत्तीचे अस्तित्व छत्तीसगड सीमेतील गावात दिसून आल्याचे समजते. हा हत्ती गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षांपासून फिरत असलेल्या कळपातील नसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर तो दुसऱ्या कळपातील असेल, तर छत्तीसगडमधून तो हत्ती आपल्या कळपाला गडचिरोली जिल्ह्यात आणण्याची शक्यताही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास रानटी हत्तींचे गडचिरोली जिल्ह्यात दोन कळप तयार होऊन नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.