दिव्यांगांच्या कल्याणासाठी जिल्हा निधीतून एक टक्का रक्कम देणार

सूक्ष्म नियोजनासह प्रस्ताव द्या- जिल्हाधिकारी

गडचिरोली : जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून चालू आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणासाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यातून दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडविणाऱ्या परिणामकारक आणि त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कामांचे प्रस्ताव सूक्ष्म नियोजनासह तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन व्यवस्थापन समितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (दि.24) पंडा यांनी घेतला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मानसी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे संचालक अभिजित राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पंडा यांनी दिव्यांग नागरिकांसाठी तयार करायचे ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) वाटपाच्या प्रगतीबाबत विचारणा करून प्रलंबित ओळखपत्र तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत ‘नमो दिव्यांग शक्ती अभियान’, ‘निरामय आरोग्य विमा योजना’, युडीआयडी कार्ड नोंदणी मोहिम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्याचे उपक्रम, तसेच नवजात बालकांसाठी श्रवण तपासणी युनिट, सहाय्यक उपकरणांचे वाटप आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांचा देखील आढावा त्यांनी घेतला.

अभिजित राऊत व चेतन हिवंज यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीची माहिती दिली. यावेळी आरोग्य सेवा व समाजकल्याणचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.