संत निरंकारी मंडळाच्या वतीने आज देसाईगंजमध्ये भव्य रक्तदान

गरजवंतांच्या जीवासाठी धडपड

रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेली मोटारसायकल रॅली

देसाईगंज : येथील संत निरंकारी मंडळ शाखेच्या वतीने यावर्षीही आज दि.25 एप्रिल रोजी (शुकवारला) देसाईगंज येथील आरमोरी मार्गावरच्या संत निरंकारी सत्संग भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरेणेने देशात तसेच जिल्हयात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे घेऊन संत निरंकारी मंडळ मानवसेवेचे कार्य करीत आहे.

सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत हे शिबिर चालणार आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी गुरूवार दि.24 एप्रिलला संत निरंकारी सेवादल सेवादलाच्या वतीने शहरभर मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यात जवळपास 100 महिला-पुरूष सहभागी झाले होते.

जिल्हयातील सर्वसाधारण, गोरगरीब रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये यासाठी जिल्हा रक्तपेढी, जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या विनंतीनुसार संत निरंकारी मंडळाकडून या रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. मागील पाच वर्षात कोविड महामारीच्या काळातही मंडळाद्वारे प्रशासनाच्या विनंतीवरून देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबीरे घेऊन अनुकमे 160, 130, 170, 254, 188 युनिट याप्रमाणे रक्त जिल्हा रूग्णालयाला पुरविले होते.

यावर्षी सदर शिबिरात परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने रक्तदान करून मानवतेच्या या कार्याला हातभार लावतील, असा विश्वास संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांनी व्यक्त केला आहे.