गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे आणि रयतेचे राजे होते. आपल्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला व प्रजेतील प्रत्येक व्यक्तीच्या व्यथा जाणणारे सहृदयी व समान न्याय देणारे कर्तव्यनिष्ठ नायक होते. अश्या शिवरायांचा इतिहास जगातील शंभराहून अधिक देशातील विद्यापीठात शिकविल्या जातो. छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती ही विश्वव्यापी आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली जिल्ह्यातील मुरमाडी येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.
गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी या छोट्याश्या गावी संपूर्ण ग्राम वासियांकडून दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यात येते. यंदाचे वर्षी शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तर अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे (उबाठा) नेते अरविंद कात्रटवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, डॉ.नामदेव किरसान, ॲड.राम मेश्राम, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार यांच्यासह इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
मुरमाडी येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारणार असल्याचे ना.वडेट्टीवार म्हणाले. यावेळी गावातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या तरुण-तरुणींचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना ना.वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील प्रजेच्या हिताचे निर्णय घेणे व प्रजेसाठी लोकशाही राज्य चालविणे हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. मात्र सध्या देशात व राज्यात लोकशाहीला व लोकशाहीची नीतिमूल्ये रुजविणाऱ्या संविधानाला समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न चालविले जात आहे. राज्यात स्त्री संरक्षण कायद्याचे मनोविकृतांकडून धिंडवडे काढले जात आहे. केवळ धर्मांधता पसरवून दिशाभूल केली जाते. त्याला बळी न पडता शिक्षण व गावाच्या एकोप्याने भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आंबेशिवणी, राजगाटा व चुरमुरा येथील कार्यक्रमात सहभाग
गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवणी येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ना.विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. राजगाटा येथे ग्रामविकास फाऊंडेशनतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ना.वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.