अहेरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अहेरी येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. शेकडो युवकांचा सहभाग असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला गांधी चौकात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह इतर मान्यवरांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, विशेष अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक एम.रमेश, सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडन्ट एम.एच. खोब्रागडे, ९ बटालियनचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
अहेरी मॅरेथॉन २०२४, अर्थात दौड स्पर्धेचा शुभारंभ अहेरीच्या मुख्य चौकात सकाळी ६ वाजता झाला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलित करून, तसेच शांतीचे प्रतीक कबुतरांना आकाशात उडवून थाटात सुरूवात करण्यात आली. तसेच आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले.
या मॅरेथॉन स्पर्धेत युवक, युवती, सीआरपीएफ ३७ बटालियनचे व ९ बटालियनचे जवान सहभागी झाले होते. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा दौड स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तथा शिल्ड देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र अलोने यांनी, तर स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.