गडचिरोली : कृषी औद्योगिक खरेदी-विक्री सहकारी संस्था कुरखेडाच्या वतीने गडचिरोली येथे शासकीय आधारभूत किमतीनुसार उन्हाळी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते दि.२९ ला करण्यात आले. या शासकीय आधारभूत किमतीनुसार धान विकून शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खासदार नेते यांनी केले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, उपसभापती डॉ.बळवंत लाकडे, संचालक लक्ष्मीकांत कुंभारे, खरेदी विक्री कुरखेडाचे अध्यक्ष व्यंकटी नागिलवार, उपसभापती हरिचंद्र डोंगरवार, तज्ञ संचालक खेमनाथ डोंगरवार, शेतकरी संतोष देशमुखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेंद्र राखडे, व्यवस्थापक सुधाकर वैरागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मका खरेदीचा लाभ घ्या- गण्यारपवार
रबी पणन हंगाम २०२२-२३ अंतर्गत चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघातर्फे शासकीय गोदाम चामोर्शी येथे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात आला. एकरी २८ क्विंटल मर्यादेत मक्याची खरेदी येथे केली जात असून त्याला १९६२ रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे दर दिला जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील चांगला मका या केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन यावेळी गण्यारपवार यांनी केले. केंद्राच्या शुभारंभप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष गुरूदास चुधरी, उपाध्यक्ष मुरलीधर बुरे, तालुका पुरवठा निरीक्षक कुमरे, संचालक नामदेव किनेकर, सुरेश परसोडे, राजू आत्राम यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.