कामठीतील लष्करी प्रशिक्षण केंद्रात एनसीसी अधिकाऱ्यांची शानदार परेड

75 दिवसांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण

नागपूर : देशातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांचे एनसीसी अधिकारी म्हणून रुजू होण्यासाठी 492 प्राध्यापकांनी कामठी येथील एनसीसी अधिकारी प्रशिक्षण केंद्रात 75 दिवसांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांची शानदार पासिंग आऊट परेट पार पडली. यावेळी भारतीय हवाई दलाच्या मेन्टेनन्स कमांडचे प्रमुख एअर मार्शल विजय कुमार गर्ग (एव्हीएसएम, व्हीएसएम) यांनी परेडचे निरीक्षण केले.

या पासिंग आऊट परेडमध्ये कॅडेट अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कवायतींचे प्रदर्शन केले. महार रेजिमेंट सेंटर सागरच्या मिलिटरी बँडने वाजवलेल्या मार्शल ट्युनवर कॅडेट प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी कुशलतेने आगेकुच केली. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 492 प्राध्यापकांचा यात समावेश होता.

ही परेड राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सच्या “शिस्त आणि एकता” या ब्रिदवाक्याचे प्रतीक आहे. कॅडेट प्रशिक्षण अधिकाऱ्यांना 75 दिवसांचे कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले. त्यामध्ये ड्रिल, शारीरिक प्रशिक्षण, नेतृत्व, व्यक्तिमत्व, समुदाय विकास आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा समावेश होता. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सर्व सीटीओंना एनसीसी कमिशन मिळाले आणि ते असोशिएट एनसीसी अधिकारी (एएनओ) झाले. पुनरावलोकन अधिकाऱ्याने आपल्या भाषणात उत्तीर्ण झालेल्या ANO ला NCC चे आचार, ध्येय आणि उद्दिष्टे टिकवून ठेवण्यासाठी आणि NCC कॅडेट्सना आपल्या देशाचे जबाबदार आणि प्रगतीशील नागरिक बनवण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले.