सिरोंचा : 19 व 20 व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचा पाया हा जातीव्यवस्था, वर्ण व वर्गव्यवस्था, तसेच पुरुषप्रधान संस्कृती असा होता. त्यामुळे आपला समाज जातीव्यवस्थेने निर्माण केलेली व्यवसायबंदी, शुद्र-अतिशुद्रांना लादलेल्या ज्ञानबंदीतून निर्माण झालेली सामाजिक आणि शैक्षणिक विषमता आणि अंधश्रद्धा यात गुंतलेला होता. त्या विषम परिस्थितीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जीवन वाहिले. फुले, शाहू व आंबेडकर यांच्या कार्यातूनच सामाजिक विषमता दूर होण्यास मदत झाली. त्यामुळे त्यांचे योगदान अमुल्य आहे, असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.
मिलिंद बहुउद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांस्कृतिक परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने 24 व 25 डिसेंबरला घेण्यात आलेल्या फुले, शाहू आंबेडकर वार्षिक उत्सवाचे ध्वजारोहण भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी नगरसेवक रवी रालबंडीवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष मदनय्या मादेशी, एम. डी. शानू, रवी सुल्तान, देवय्या येनगंदुला, नगरसेवक नरेश अलोने आदी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या उत्सवात परिवर्तन रॅली, परिसंवाद, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, भीम गीत कार्यक्रम तसेच कव्वालीचा मुकाबला घेण्यात आला.