आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जपावी- खा.अशोक नेते

पुतळ्यांचे अनावरण व समाजप्रबोधन कार्यक्रम

गडचिरोली : गोटुल समिती व आदिवासी समाज बांधव, तसेच गावकऱ्यांच्या वतीने धानोरा तालुक्यातील मौजा-मिचगांव खुर्द, तसेच सावली तालुक्यातील कापसी या दोन ठिकाणी वीर बाबुराव शेडमाके आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पांदि पारी कुपार लिंगो, तसेच सल्ला गांगरा यांच्या पुतळयांचा अनावरण सोहळा आणि समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खा.अशोक नेते होते. त्यांच्या हस्ते दोन्ही ठिकाणी पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना खा.नेते म्हणाले, आदिवासी समाज बांधवांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. इतर समाजाच्या तुलनेत आदिवासी बांधवही मुख्य प्रवाहात यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या. काँग्रेसने अनेक वर्ष सत्ता उपभोगली, पण खऱ्या अर्थाने मोदीजी यांनी देशात १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंतीनिमित्त हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून जाहीर केला. राष्ट्रपती म्हणून सर्वप्रथम द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी महिलेची निवड केली. वीर बाबुराव शेडमाके देशासाठी लढले. असा वीर लढवय्या पुरुष आपल्या समाजाच्या मातीत जन्मला, याचा अभिमान वाटला पाहिजे. यासाठी त्यांचे विचार, आचार, आदिवासी समाज बांधवांनी आत्मसात करावा. आदिवासी समाजबांधवांनी एकत्र येऊन आपली संस्कृती जपावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गावकऱ्यांनी सांगितलेल्या समस्या व अडीअडचणी जाणून घेत समस्यांचे निराकारण निश्चितच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

कापसी येथे आयोजित कार्यक्रमात प्रामुख्याने माजी जि.प. बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, बाजार समितीचे संचालक तथा भाजपचे युवा नेते सचिन तंगडपल्लीवार, माजी पं.स.उपसभापती रविंद्र बोल्लीवार, उपसरपंच परशुराम भोयर, खा.नेते यांचे सोशल मीडिया प्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य दिवाकर गेडाम, आदिवासी समाज अध्यक्ष पुरूषोत्तम शेडमाके, माजी सरपंच पत्रुजी परचाके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निंबाजी चलाख, ग्रा.पं.सदस्य जनार्दन गुरुनुले, भाजपचे बुथ प्रमुख रोशन अंसारी, प्रदीप चलाख, तसेच मोठ्या संख्येने गोटुल समाज व आदिवासी समाज बंधुभगिनी, गावातील नागरिक उपस्थित होते.