गडचिरोली : पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदान दिनानिमित्त शुक्रवारी (दि.14) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पोलिस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कार्याल सिरोंचा येथे झालेल्या या शिबिरात एकूण 560 दाते रक्तदानासाठी सरसावले. विशेष म्हणजे यात 50 पेक्षा जास्त महिलांचाही सहभाग होता.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी स्वत: रक्तदान करुन रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. रक्तगटाचा शोध लावणारे ऑस्ट्रीयन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांच्या जयंतीनिमित्त सन 2004 पासून 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो.
जगभरात रक्ताची आवश्यकता, त्याची मागणी व त्याचा गरजेबद्दल जागरुता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी या दिनाचे औचित्य साधुन गडचिरोली पोलिस दलामार्फत रक्तदान शिबिरांसाठी पुढाकार घेण्यात आला. या शिबिरांमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी (सिरोंचा) संदेश नाईक, उपविभागीय पोलिस अधिकारी (हेडरी) योगेश रांजणकर, तसेच विविध शासकिय विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि गडचिरोली पोलिस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे पोलिस अधिकारी व अंमलदार, यासोबतच नागरिकांनीही उत्स्फुर्त सहभाग घेतला.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, तसेच सीआरपीएफचे डेप्युटी कमांडण्ट (192 बटा.) शिव महेन्द्र सिंग, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके, मुख्य वैद्यकिय अधिकारी, पोलिस रुग्णालय गडचिरोली डॅा.सुनील मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.