चामोर्शी ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक राजेश खांडवे अखेर निलंबित

गण्यारपवारांना मारहाणीनंतर न्यायाधिशांसोबतही असभ्य वर्तन

गडचिरोली : कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीदरम्यान भल्या पहाटे तत्कालीन माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना पोलीस ठाण्यात बोलवून मारहाण केल्याच्या आरोपानंतर आता चक्क न्यायाधिशासोबतही असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना अखेर निलंबित व्हावे लागले. खांदवे यांच्या वाढत्या मुजोरीला लगाम घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने पदावरून दूर करत निलंबित केले. याचवेळी खांदवे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आणि जि.प.चे माजी कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांना गेल्या गेल्या महिन्यात बाजार समितीच्या निवडणुकीच्या धामधुमीत भल्या पहाटे पोलीस ठाण्यात बोलवून खांडवे यांनी मारहाण केल्याचा ठपका त्यांच्यावर गण्यारपवार यांनी ठेवला होता. या मारहाणीत त्यांचा एक हातसुद्धा फ्रॅक्चर झाला. खांडवे यांच्या या वर्तणुकीमुळे त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चामोर्शीत आंदोलनही झाले. मात्र योग्य पुरावा नसल्याचे सांगत वरिष्ठांनी खांडवे यांना अभय दिले. त्यामुळे खांडवे यांची हिंमत आणखीच वाढली.

अशातच गण्यारपवार यांच्या तक्रारीवरून चामोर्शीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी.मेश्राम यांनी दोन्ही बाजुचे म्हणणे एेकल्यानंतर २० मे रोजी पोलीस निरीक्षक खांडवे यांच्यावर कलम २९४, ३२४, ३२६, ३४२ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यामुळे पुन्हा एकदा खांदवे यांचा राग उफाळून आला.

दि.२५ ला सकाळी खांदवे न्या.मेश्राम यांच्या निवासस्थानी गेले. आपल्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या आदेशावरून त्यांनी न्या.मेश्राम यांच्याशी हुज्जत घालत असभ्य वर्तन केले. ही बाब मेश्राम यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या कानावर टाकली. निलोत्पल यांनी प्रकरणाचे गांभिर्य ओळखून डीआयजी संदीप पाटील यांच्या कानावर हे प्रकरण टाकले. खांडवे यांना रोखण्यासाठी वरिष्ठांनी त्यांना तातडीने निलंबित करण्याचा निर्णय घेतला.