लोहखनिजाच्या वाहतुकीतून आलापल्ली होणार बाद !

येलचिल ते वेलगुरटोला मार्गाने होणार वाहतूक, वनविभागाची मंजुरी

गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्लीतून लोहखनिजांच्या वाहनांची होणारी वाहतूक टाळण्यासाठी आता नवीन मार्गाला वनविभागाने मंजुरी दिली आहे. येलचिल ते वेलगुरटोला या सध्या अस्तित्वात असलेल्या कच्च्या मार्गाचे मजबुतीकरण करून या मार्गाने ही वाहतूक वळविली जाणार असल्यामुळे आलापल्लीकरांची या वाहतुकीतून सुटका होणार आहे.

लोहखनिजांच्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे आलापल्लीतील व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून ही वाहतूक दुसरीकडून वळती करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. यादरम्यान काही अपघात झाल्यामुळे या मागणीने जोर पकडला होता. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर वाहतुकीसाठी ‘मायनिंग कॅारिडोर’ तयार करण्याचे जाहीर केले होते. त्याचाच एक भाग म्हणून मुत्तापूर, वडलापेठ, आपापल्ली, वेलगुरटोला आणि येलचिल या वनक्षेत्रातून जाणाऱ्या मार्गाच्या मजबुतीकरणाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने वनविभागाकडे दिला होता. त्यातील येलचिल ते वेलगुरटोला या मार्गाला वनविभागाने मंजुरी दिली आहे.

या नवीन मार्गामुळे सुरजागड खाणीकडून येणारी वाहने आलापल्लीला न जाता येलचिल येथून वेलगुरटोलाकडे येऊन आष्टी मार्गाने पुढे मार्गक्रमण करतील. हा मार्ग स ७.५० मीटर रूंद आहे. त्याचे आणखी जास्त रूंदीकरण न करता आहे तेवढ्याच रूंदीत रस्त्याचे मजबुतीकरण करण्यास परवानगी देण्यात आली. हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा राहणार नसून डांबरी रस्ता करता येईल, अशी माहिती वनसंरक्षक डॅा.किशोर मानकर यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना दिली.

आलापल्लीचे महत्व कमी होणार?
दरम्यान या नवीन पर्यायामुळे लोहखनिज वाहतुकीचा आलापल्लीकरांशी असलेला संबंध तुटणार असल्यामुळे आलापल्लीचे महत्व कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे येलचिल, वेलगुरटोलाकडून जाणाऱ्या बायपास मार्गाचे महत्व वाढणार असल्यामुळे त्या मार्गावर जमिनी खरेदी करण्याकडे काही स्थानिक नेत्यांनी हालचाली सुरू केल्याचे समजते. धुळीमुळे पिकांची हाणी होते, असे सांगत कमी दरात शेतकऱ्यांकडून रस्त्यालगतच्या जमिनी खरेदी करण्याचे प्रकार काही दिवसात वाढतील. परंतू याच जमिनीचे दर काही दिवसांत भरमसाठ वाढणार आहेत. या मार्गावर भविष्यात अनेक व्यवसाय उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.