गडचिरोली : ‘मला बाकी काही नको, मला माझे पती द्या, माझ्या मुलींना त्यांचे पप्पा द्या…’ असे आर्जव करत शहीद पोलीस जवान महेश नागुलवार यांच्या वीरपत्नीने फोडलेल्या आर्त टाहोने बुधवारी पोलीस मुख्यालयाचा संपूर्ण परिसर गहिवरून गेला. अनेकांना त्यावेळी आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. शहीद महेश यांच्या पार्थिवावर तिरंगा ध्वज चढवून पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी त्या धीरगंभीर वातावरणाला वीरपत्नी आणि वीरमातेच्या आर्त टाहोने उपस्थित अनेक शहीद पोलीस जवानांच्या परिवारांची आपल्या घरातील जवानाच्या मृत्यूची आठवण ताजी केली आणि त्यांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी केली. यावेळी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष अभियान) राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहीद महेश यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
सजवलेल्या वाहनातून महेश नागुलवार यांचा मृतदेह पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आणल्यानंतर त्यावर सन्मानपूर्वक तिरंगा चढविण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहिले. पोलीस पथकाने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर मृतदेह सजवलेल्या वाहनातून अनखोडा येथे नेण्यात आला.
म्हणून लागला उपचाराला विलंब
यावेळी वीरपत्नीने हेलिकॅाप्टरसारखी सुविधा उपलब्ध असतानाही आपल्या पतीला वाचविण्यात यश आले नाही अशी खंत पोलीस अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष अभियान) राजकुमार व्हटकर यांनी उपचार मिळण्यास विलंब होण्यामागील कारण स्पष्ट केले. ज्या ठिकाणी ही चकमक झाली ते ठिकाण जंगलात बरेच आतमध्ये होते. त्यात चकमकही सुरूच होती. त्यामुळे तेथून जखमी अवस्थेत महेश नागुलवार यांना जवळच्या हेलिपॅडपर्यंत आणण्यासाठी अडीच ते तीन तास लागले. बंदुकीची गोळी त्यांच्या छातीतून आरपार निघून गेल्याने बराच रक्तस्राव झाला होता. त्यातूनच महेश नागुलवार यांचा मृत्यू झाला.