गडचिरोली : गोंडवाना युनिव्हर्सिटीअंतर्गत जीवन सीताराम पाटील मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील विद्यार्थी प्रथम वासुदेव कोरेत याने नुकत्याच हरियाणा (रोहतक युनिव्हर्सिटी) येथे झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कराटे चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक पटकावले. त्याने तीन राज्यातील खेळाडूंना पराभूत करून हे यश मिळवले.
या स्पर्धेत संपूर्ण भारतातून चार झोन सहभागी झाले होते. त्यात प्रथम कोरेत यांने 67 किलो वजनगटात कु्मिते या प्रकारात पंजाब, केरळ, गुजरात ला पराजित केले. यापूर्वी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी गोंडवाना युनिव्हर्सिटीला कराटे खेळात अनेक पदके जिंकून दिली आहेत.
प्रथम कोरेत याने पूर्वी शालेय कराटे स्पर्धांमध्ये 2 सुवर्णपदक जिंकले आहेत. तो प्रशिक्षक शिहान योगेश चव्हाण व सेन्साई मिलिंद गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. याापुढे तो भारताचे प्रतिनिधीत्व करून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याचे स्पप्न बाळगून आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका अनिता लोखंडे, प्राचार्य संजय मुरकुटे, जिल्हा क्रीडा अधीकारी भास्कर घटाळे, गडचिरोली कराटे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वाघरे, उपाध्यक्ष रुपराज वाकोडे, सोनाली चव्हाण, कपिल मसराम व आई वडीलांना दिले.