चामोर्शी : तालुक्यातील 11 तलावांचे खोलीकरण करण्यासाठी लोकसहभागासह नाम फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स सहकार्य करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पुढाकाराने गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली.

चामोर्शी पंचायत समितीत झालेल्या या बैठकीला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांची उपस्थितीत होती. यावेळी नाम फाऊंडेशनचे उमेश पाटील, मानवाधिकार संघटनेचे डॅा.प्रणय खुणे, मृदा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता गजभिये, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत चामोर्शी तालुक्यातील जयनगर, कृष्णनगर, सोनापूर, मारोडा, जामगिरी, भोगोनबोडी, वाघधरा, नवग्राम, येनापूर, सोमनपल्ली, ठाकरी या 11 गावातील तलावांचे खोलीकरण केले जाणार आहे. तलाव खोलीकरण करताना गावातील नागरिकांचा सहभाग व्यापक प्रमाणात असावा याकरिता समन्वय ठेवण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. व्यवस्थित चर्चा करून सर्व कामाची रुपरेषा आखण्यात आली.