गडचिरोली जिल्ह्यात १२ हजार घरांमधील अंधार महावितरणने केला दूर

दिड वर्षात नवीन जोडण्या देण्यास प्राधान्य

गडचिरोली : विपरित भौगोलिक परिस्थिती आणि दुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अजूनही काही गावांमध्ये वीज पुरवठा पोहोचलेला नाही. पण गेल्या दिड वर्षात महावितरण कंपनीने गडचिरोली जिल्ह्यात १९ हजार ५५८ ग्राहकांना नव्याने वीज जोडण्यात दिल्या आहेत. त्यात १२ हजार घरगुती ग्राहक असून त्यांच्या घरात पहिल्यांदाच वीज पोहोचल्याने त्यांच्या घरातील अंधार दूर झाला आहे.

महावितरणच्या गडचिरोली मंडळात एप्रिल २०२२ ते १० ऑक्टोबर २०२३ या वर्षभराच्या कालावधीत विविध वर्गवारीतील नवीन ग्राहकांना वीज जोडण्यात दिल्या. त्यात घरगुती १२ हजार २, वाणिज्यिक १ हजार ७९७, औद्योगिक २०६, सरकारी कार्यालये ३४९, पाणी पुरवठा ७४, पथदिवे ५६, कृषिपंप ४ हजार ४०, कुक्कूट पालन ३०, इतर लघुदाब ६१ आणि तात्पुरत्या ९४३ अशा एकंदरीत १९ हजार ५५८ वीजजोडण्या देण्यात आल्या.

तसेच उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजनेअंतर्गत गडचिरोली मंडळात १ हजार ४५८ रोहित्रे बसविण्यात आली. या रोहित्रांच्या माध्यमातून १ हजार ४७२ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

आपले कर्तव्य पार पाडत आपली जबाबदारी ओळखून महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना सुरळीत सेवा प्रदान करण्यास नेहमी तत्पर असतात. परंतु थकबाकीमुळे महावितरणला ग्राहकांच्या दारात वसुलीसाठी जावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.