आमचा लोहखाणीला विरोध नाही, पण स्थानिकांना रोजगाराची हमी द्या

झेंडेपारच्या जनसुनावणीसाठी उसळली गर्दी

गडचिरोली : झेंडेपारच्या लोहखाणीला आमचा विरोध नाही, पण यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार मिळण्याची हमी द्या, असा सूर मंगळवारी झेंडेपार लोहखाणीच्या जनसुनावणीत बहुतांश लोकांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिधींनीही त्या सुरात सूर मिसळत नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा रास्त असल्याचे म्हटले. पाचही कंपन्यांच्या वतीने त्यांच्या पर्यावरण सल्लागाराने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची हमी देत नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न व शंकांचे निरसन केले.

जिल्ह्यातील कोरची तालुक्यात झेंडेपारच्या लोहखाणींची लिज पाच कंपन्यांना मिळाली आहे. त्या खाणीतून लोहखनिज काढताना होणाऱ्या प्रदुषणाबाबतचे आक्षेप आणि कंपन्यांची भूमिका याबाबत मंगळवारी (दि.१०) प्रदुषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणविषयक जनसुनावणी ठेवली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात झालेल्या या जनसुनावणीसाठी भवनाच्या बाहेरही मंडप टाकून सभागृहातील चर्चा स्क्रिनवर पाहण्याची सुविधा केली होती. जिल्हाधिकारी संजय मीना, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, सहायक जिल्हाधिकारी ओंकार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी उमेश भादुले आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

सुरूवातीला पाचही कंपन्यांच्या वतीने शासनाकडून मिळालेल्या लिजच्या क्षेत्राची, खाणीतून निघणाऱ्या कच्च्या मालाची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल याची माहिती देण्यात आली. पाचही कंपन्या मिळून एकूण ४६.५७ हेक्टर क्षेत्रातील लोहखनिज काढल्या जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुरूवातीला माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी यांनी विविध प्रश्नांमधून आपल्या शंका उपस्थित केल्या. तसेच आमचा विकासाला विरोध नाही, पण आदिवासींच्या जीवनमानावर दुष्परिणाम होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय झेंडेपार परिसरातील अनेक महिला-पुरूषांनी आपले मनोगत व्यक्त करताना पूर्वजांनी जपून ठेवलेला हा ठेवा तुमच्या ताब्यात देताना त्याचा योग्य मोबदला द्यावा, कौशल्य विकासातून स्थानिकांना रोजगार मिळावा, प्रदुषण नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात यावर भर दिला.

आ.डॅा.देवराव होळी यांनी लोहखनिज बाहेर न नेता स्थानिक स्तरावर उद्योग उभारणी करण्याचे, तर आ.कृष्णा गजबे यांनी शैक्षणिक आणि आरोग्याच्या सुविधांसाठी बजेट वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेसचे नेते डॅा.नामदेव किरसान यांनी कोरची तालुक्यातील सर्व क्षेत्र पेसाअंतर्गत असल्याने ग्रामसभांची परवानगी गरजेची असल्याचे सांगितले.

युवाशक्ती विधायक कामाकडे वळेल- खा.नेते

यानंतर खा.अशोक नेते यांनी एका युवकाने व्यक्त केलेल्या उद्योगविरहित जिल्हा ही ओळख पुसून टाकण्याच्या मुद्द्याचा धागा पकडत हा जिल्हा आता औद्योगिक नकाशावर निश्चितपणे झळकेल, अशी ग्वाही दिली. खाण उद्योगापाठोपाठ इतरही उद्योगांसाठी या जिल्ह्याची दारे उघडी झाली आहेत. त्यामुळे रोजगाराच्या वाटा प्रशस्त झाल्या. त्यातून वाईट कामात गुंतलेल्या युवाशक्तीला विधायक कामांकडे वळवणे शक्य होईल, अशी आशा व्यक्त केली.

नियोजन भवनात थोडी खडाजंगी

यावेळी ग्रामसभांची परवानगी घेतली किंवा नाही, या मुद्द्यावरून सभागृहात थोडी खडाजंगी झाली. काहींनी आम्हाला गावात रोजगार मिळतो, उद्योगाची गरज नाही, असे म्हणताच दुसरीकडून काही युवक आक्रमक झाले. आम्हाला रोजगार पाहिजे, असे म्हणत त्यांनी खाण आणि उद्योगांचे समर्थन केले. जिल्हाधिकारी संजय मिना यांनी खडाजंगी करणाऱ्यांना शांत करत आपले म्हणणे समोर येऊन माईकमध्ये मांडावे. प्रत्येकाचे म्हणणे व्हिडीओ रेकॅार्डिंगमध्ये येईल असे सांगितले.

टी-पॅाईंट परिसरात युवकांची नारेबाजी

दरम्यान ही सुनावणी आटोपल्यानंतर कोरची तालुक्यातून आलेल्या काही युवकांनी आम्हाला रोजगार द्या, आमच्या हाताला काम द्या, असे म्हणत नारेबाजी करून लक्ष वेधले. त्यातील काही युवकांना उशिरा आल्यामुळे प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांना आपले म्हणने जनसुनावणीत मांडणे शक्य झाले नाही. परिणामी नारेबाजीतून त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या.