आरमोरी : क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या आरमोरी येथील प्रकाश चषक रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेच्या चुरसपूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात आरमोरीच्या अक्षय एलेवन संघाने गडचिरोलीच्या नवशक्ती क्रिकेट संघावर मात करत प्रकाश चषक पटकावला. गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार आणि माजी आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते विजेत्या संघाला 3 लाखांचे बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या नवशक्ती संघाला 1 लाख 75 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
युवामंच, प्रकाश चषक आयोजन समिती आणि मॅार्निंग क्रिकेट ग्रुपच्या वतीने या प्रकाश चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी आयोजनाचे तिसरे पर्व होते. हितकारिणी विद्यालयाच्या क्रीडा संकुलात विद्युत प्रकाशझोतात खेळविल्या गेलेल्या या सामन्यांमध्ये जिल्ह्याबाहेरीलच नाही तर राज्याबाहेरील संघही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे आयपीएल सामन्यांमधील खेळाडू कामरान खान (हैदराबाद), सागर भंडारी (बंगलोर) हेसुद्धा आरमोरीच्या मैदानात खेळल्याने आरमोरीकरांसह परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी हे सामने एक पर्वणी ठरले.
समारोपीय कार्यक्रमात मॅन आॅफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज, उत्कृष्ट खेळाडू अशा विविध पुरस्कारांनी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. तसेच यूट्युबवर थेट प्रक्षेपण दाखविणारे संदेश वाघमारे, लायटिंगची सजावट करणारे साहिल सय्यद, कॅामेंट्री करणारे जी.एम.खान, निलरतन मंडल, स्कोअरर हितेश कोपुलवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष हैदर पंजवाणी, प्राचार्य सचिन खोब्रागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे, पोलीस उपनिरीक्षक सुरज अनपट, पवन नारनवरे, पंकज खरवडे, भारत बावनथडे, सुशील पोरेड्डीवार उपस्थित होते.