गडचिरोली : विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, एवढेच नाही तर उच्चशिक्षण संपल्यानंतर लहान-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध व्हावे, हा दृष्टिकोन ठेवून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वप्नसंचय योजना सुरू केली आहे. त्याचा शुभारंभ बँकेच्या मुख्य कार्यालयात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास कावळे यांच्या प्रमुखय उपस्थितीत करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष प्रंचित अ.पोरेड्डीवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या नाविन्यपूर्ण स्वप्नसंचय योजनेचा विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना बचतीची सवय लावण्यासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमात बोलताना कॅफो विलास कावळे म्हणाले, बँकेने विद्यार्थ्यांना लहान वयापासून बचतीची सवय लावण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध होईल. त्यामुळे या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, विद्यार्थ्यांना बचतीच्या सवयीसोबत उच्च शिक्षणासाठी कोणतेही तारण न घेता कर्ज सुविधा बँकेकडून मिळणार आहे. त्यातही बँकेच्या प्रचलित व्याजदरापेक्षा मुदत ठेवीवर जास्त व्याज आणि सवलतीच्या व्याजदरात कर्ज पुरवठा उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमात गडचिरोली शहर व परिसरातील जिल्हा परिषद, कॅान्व्हेंट व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्वप्नसंचय योजनेचे बचत खाते उघडणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना बचत किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, संचालक डॅा.बलवंत लाकडे, सुलोचना वाघरे, शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. संचालन सरव्यवस्थापक राजू सोरते यांनी तर आभार प्रदर्शन किरण सांबरे यांनी केले.