खनिज संपत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना-खा.नेते

खासदार औद्योगिक महोत्सव स्थळाचे भूमिपूजन

गडचिरोली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रीडा महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून विदर्भातील चांगल्‍या खेळाडूंना समोर आणले. आता संपूर्ण देशात क्रीडा महोत्‍सवांचे आयोजन केले जात आहे. आता त्‍यांनी ‘खासदार औद्यागिक महोत्‍सव-अॅडव्‍हांटेज विदर्भ’च्‍या माध्‍यमातून विदर्भातील उद्योगांना प्रोत्‍साह‍ित करण्‍याचे महत्‍वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे नवीन वर्षात उद्योगांना नवी दिशा मिळत असून त्‍यामुळे विदर्भात उद्योजक आणि युवकांमध्‍ये नवी चेतना निर्माण होईल, असा आशावाद गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक ‌नेते यांनी व्‍यक्‍त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आकाराला आलेल्‍या असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्हलपमेंटच्‍या वतीने येत्‍या 27 ते 29 जानेवारीदरम्‍यान ‘खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भ’चे आयोजन राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात होणार आहे. या महोत्‍सवाच्‍या स्‍थळाचे भूमिपूजन बुधवारी खा.नेते यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

गडचिरोली ज‍िल्‍ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात आहे. केवळ पायाभूत सुविधांच्‍या अभावामुळे येथे उद्योग येऊ शकले नाही, अशी खंत व्‍यक्‍त करताना अॅडव्‍हांटेज विदर्भचा लाभ गडचिरोली जिल्‍ह्याला म‍िळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्‍यक्‍त केली.

याप्रसंगी वर्धेचे खासदार रामदास तडस, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आ.मोहन मते यांच्यासह वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अनुप खंडेलवाल, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, शारदा इस्‍पात लि.चे नंदक‍िशोर सारडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, माजी महापौर कल्‍पना पांडे, गोविंद देहडकर यांच्‍यासह औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्‍यवर उपस्थित होते.

अॅडव्‍हांटेज विदर्भच्‍या यशस्वीतेसाठी असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्हलपमेंटचे उपाध्‍यक्ष प्रणव शर्मा व गिरधारी मंत्री, सदस्‍य राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ.महेंद्र क्षीरसागर, प्रदीप माहेश्‍वरी, प्रशांत उगेमुगे व रवींद्र बोरटकर हे परिश्रम घेत आहेत.