कॅम्पमधील सशक्तीकरण अभियानात ७१२५ महिलांना लाभांचे वितरण

खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभाग

गडचिरोली : राज्यात महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकिय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ राबविणे सुरू आहे. त्या अनुषंगाने बुधवारी (दि.३) गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने कॅम्प एरियातील संविधान चौकात हे अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमात विविध योजनांचे स्टॉल लावले होते. त्यात १५३४ महिलांनी हजेरी लावली. सदर महिलांना विविध योजनेअंतर्गत ७१२६ लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्यातील कौशल्याची चुणूक दाखविली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला जिल्हाप्रमुख अमिता मडावी, उद्घाटक म्हणून माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तसेच लता लाटकर, वैष्णवी नैताम, वसंतराव गावत्रे, नितेश बोम्मनवार, अश्विनी भांडेकर, मुक्तेश्वर काटवे, रमेश भुरसे, श्रीदेवी वरगंटीवार, केशव निंबोड, शारदा दामले, ताई चन्नावार, देवाजी लाटकर, सोपानदेव मशाखेत्री, उमा बंसोड, गिता बोबाटे, किरण राठोड प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संध्या चिलमवार यांनी केले.

सदर कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, समूह नृत्य, संगित खुर्ची स्पर्धा आयोजीत केली होती. विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, नगर परिषद शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी सहकार्य करत प्रतिसाद दिला. आभार गणेश ठाकरे यांनी मानले.