छत्तीसगड सीमेकडील 13 गावांनी शस्र जमा करत घेतला नक्षलवाद्यांना गावबंदीचा निर्णय

नक्षलींच्या गडातच अस्तित्वाला सुरूंग

गडचिरोली : भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील आणखी पाच गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 250 नागरिकांनी लाहेरी उपपोलिस स्टेशनला येऊन पाच भरमार बंदुकांसह 200 ते 300 लोखंडी सळाखी जमा केल्या. याशिवाय धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नेलगुंडा येथील नागरिकांनी कुकरमध्ये ठेवलेल्या आयडीसदृश वस्तू आणि जवळपास 450 सळाखी पोलिसांकडे जमा केल्या. यामुळे गेल्या 10 दिवसांत एकूण 13 गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नक्षलवाद्यांचा गड असणाऱ्या छत्तीसगड सीमेकडील गावांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या अस्तित्वाला सुरूंग लावणारा ठरणार आहे.

माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलिस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडानअंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे नागरिकांचे मतपरिवर्तन होत आहे. यापूर्वी 14 जूनला धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते नक्षल गावबंदी करून त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी धोडराज यांना सादर केला होता. त्यानंतर भटमारच्या गावकऱ्यांनीही दि.20 जून रोजी गावबंदीचा निर्णय घेत नक्षलवाद्यांनी ठेवलेले स्फोटक साहित्य पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यात आणखी भर म्हणून वरिष्ठ नक्षल नेता गिरीधर तुमरेटी याने पत्नीसह दि.22 ला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

दिनांक 24 जून रोजी उपविभाग भामरागडअंतर्गत लाहेरी हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल या पाच गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते नक्षल गावबंदी करून तसा ठराव लाहेरी उपपोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला. माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भामरागड व अबुझमाड जंगल परिसरातच त्यांच्या अस्तित्वाला खिंडार पडले आहे.

गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलिस दलाने जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ.च्या माध्यमातून येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविल्याने पोलिस दलावरील गावक­ऱ्यांचा विश्वास दृढ झाला.

गावकऱ्यांचे हे मतपरिवर्तन घडविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते, उपपोस्टे लाहेरी येथील प्रभारी अधिकारी संतोष काजळे, पो.उपनिरीक्षक प्रशांत डगवार, सचिन सरकटे, आकाश पुयड धोडराज येथील प्रभारी अधिकारी शरद काकळीज, पोउपनि.अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली.

गडचिरोली पोलिस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्याला माओवादमुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.