चार गुन्ह्यात पोलिसांनी दारू आणि वाहनांसह पकडला 33 लाखांचा मुद्देमाल

पाच आरोपींनाही घेतले ताब्यात

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनधिकृतपणे दारूची तस्करी करण्याची चार प्रकरणे पोलिसांनी उघडकीस आणली. यात देशी-विदेशी दारू, हातभट्टीची दारू आणि वाहनांसह 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातून देशी-विदेशी दारू गडचिरोली जिल्ह्यात आणली जात होती.

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता (अहेरी) यांच्या संयुक्त कारवाईत अतिसंवेदनशिल नैनगुंडम गावात अवैध दारुसह एकुण 12 लाख, 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अहेरी पोलिसांच्या पथकाने वाहनासह एकूण 10 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पथकाने दोन विविध ठिकाणच्या कारवाईत 9 लाख 93 हजार रुपये किमतीचा अवैध दारुसाठा जप्त केला. अशा एकूण चार गुन्ह्रात 5 आरोपींना घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आले. या कारवाया अहेरी तालुक्यातील नैनगुंडम या गावात, बोटलाचेरु गावाजवळ, तसेच रेपनपल्ली पो.स्टे.हद्दीतील लिंगमपल्ली टोला येथे करण्यात आल्या.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी (अहेरी) अजय कोकाटे, एलसीबीचे पो.निरीक्षक उल्हास भुसारी, अहेरीचे प्रभारी अधिकारी दशरथ वाघमोडे, सपोनि.राहुल आव्हाड, पोउपनि.राजू गवळी, विजय सपकाळ, सरीता मरकाम, करुणा मोरे, संकेत सानप व त्यांच्या पथकातील पोलिस जवानांनी केली.